धक्कादायक : पत्नीने गळफास घेतला , वडील मुलाला फासावर लटकावत आहेत आणि मुलगी मोबाईलवर शूट करते आहे….

पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर वडील निर्दयीपणे आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घरातल्या पंख्याला बांधलेल्या फासावर लटकवत आहेत आणि मुलगा तडफडत असतानाचा व्हिडिओ त्याची १७ वर्षांची बहीणच मोबाईलवर शूट करते आहे, या भयंकर घटनेमागचं सत्य त्याच व्हिडिओमुळे उघड होत आहे. बंगळुरूच्या विभूतीनगर भागात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय मराठी भाषिक कुटुंबात ही धक्कादायक घटना घडली असून यामुळे बंगलोर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी वडील सुरेश बाबू याला ताब्यात घेतलं असून त्याने दिलेल्या जबाबानुसार, डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे पत्नी गीता, १२ वर्षांचा मुलगा आणि १७ वर्षांच्या मुलीसह त्यांच्या सगळ्या कुटुंबानेच सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेत मुलगा आणि आईचा मृत्यू झाला आहे. मुलाला फासावर लटकवल्यानंतर बायको – गीताबाईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. पण हे सुरू असताना १७ वर्षांची मुलगी मोठमोठ्याने रडत आणि ओरडत होती. तो आवाज ऐकून शेजारी जमा झाले आणि आपण आत्महत्या करू शकलो नाही, असं सुरेश बाबूचं म्हणणं आहे. पण मुलीने केलेल्या या व्हिडिओमुळे वेगळंच सत्य पुढे येत आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
काल घडलेल्या या घटनेनं सारं बेंगळुरू शहर हादरलं आहे. या घटनेमागची खरी गोष्ट शोधायचा पोलीस तपास करत आहेत. मुलीने केलेला हा व्हिडिओच आता वेगळं काही सांगायचा प्रयत्न करतो आहे. या व्हिडिओत सुरेश मेजावर चढून आपल्या मुलाला हाताने उचलून पंख्याला लावलेल्या फासावर अडकवताना दिसतो आहे. त्या वेळी आई आणि बहीण ‘त्याला सोडा, त्याला सोडा’ असं ओरडत रडत अवतीभवती फिरत असल्याचं दिसत आहे. ३ मिनिटं, ४७ सेकंदांचा हा व्हिडिओ अचानक थांबतो. आईने या मुलीच्या हातातून मोबाईल काढून घेतला असावा असं वाटतं. हा व्हिडिओ या मुलीने कुणाला तरी पाठवला असावा, तिथून तो व्हायरल झाला. सध्या पोलिसांनी वडील सुरेश बाबू आणि मुलगी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतल्यानंतर सुरेश आणि त्याची मुलगी वारंवार जबाब बदलत आहेत. सुरेश एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी गीता काही घरांमध्ये स्वयंपाकाची कामं करत असे. गीताने उधार घेतलेले ५ लाख रुपये चुकते करायची परिस्थिती नव्हती आणि घरात आर्थिक चणचण होती. त्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं सुरुवातीला पुढे येत होतं. पण चिट फंडासाठी सुरेशनेही अनेक लोकांकडून उधारीवर पैसे घेतल्याचं आणि ते लोक आता वसुलीसाठी मागे लागल्याचं समोर येत आहे. या आर्थिक अडचणींमुळे हे पती-पत्नी वैतागले होते, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. सामूहित आत्महत्या करण्यावर पती- पत्नी दोघेही राजी झाले. हे कुटुंब महाराष्ट्र – गुजरात सीमेजवळच्या भागातलं होतं आणि सध्या बेंगळुरूमध्ये वास्तव्याला होतं, असं पोलिसांनी सांगितलं.