सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ नक्सली ठार

झारखंडमधील डुमका येथे आज रविवारी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर यामध्ये एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील डुमका येथे चकमक झाली. रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक झाली. चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी चार जवान जखमी झाले तर एक जवान शहीद झाला. नक्षलवाद्यांशी लढताना गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर इतर तीन जवानांवर दुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात १५ ते २० नक्षलवादीअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.