डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : फरार तीन आरोपी महिला डॉक्टरांचे “मार्ड “ला पत्र

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेल्या तीन महिला डॉक्टरांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती ‘मार्ड’कडे केली आहे. रुग्णालय प्रशासनाने चौकशी करावी. पोलीसामार्फत आणि माध्यमांच्या दबावाखाली तपास करणे योग्य नाही. आमचीही बाजू ऐकून घ्या,’ अशा आशयाचे पत्र आरोपी डॉक्टरांनी ‘मार्ड’ला लिहिले आहे.
दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर ‘बेपत्ता’ असल्यामुळे त्यांची बाजू समोर आलेली नाही. त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सहकारी डॉक्टरांच्या रॅगिंगचा त्रास असह्य़ झाल्याने पायल तडवी हिने आत्महत्या केली. जातीवाचक शेरेबाजी केली जात असल्यामुळे पायलने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी रुग्णालयातील डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आले. मात्र त्या तिघीही बेपत्ता आहेत.
महाविद्यालयांत आणि संलग्न महाविद्यालयांत रॅगिंग विरोधी कायद्याची अंमलबजावणी होते का? असा प्रश्न महिला आयोगाने विचारला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत आयोगाकडे पाठवण्यात यावा,’ असे आदेश आयोगाने दिले आहेत.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकणाच्या चौकशीची मागणी करण्यासाठी सोमवारी काही सामाजिक संघटनांनी मुंबईत आंदोलन केले. ‘या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. पायलला त्रास देणाऱ्या डॉक्टरांना अटक करावी, आरोपी डॉक्टरांची पदवी रद्दबातल करावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. वंचित बहुजन आघाडी, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. डॉ. पायल हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. समाज माध्यमांवरही डॉ. पायलच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीने जोर धरला आहे. काहींनी डॉ. पायल हिच्या छायाचित्रासह आरोपी डॉक्टरांची छायाचित्रेही समाजमाध्यमांवर प्रसारित करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. पालिकेतील विरोधी पक्ष नेता रवी राजा, समाजवादी नेते रईस शेख यांनीही नायर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांनीही डॉ. पायल हिला न्याय मिळावा, अशी मागणी करणारे ट्विट केले आहे. तसेच काही सामाजिक संस्था-आणि संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.