पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या १३ नेत्यांचे राजीनामे

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु झालं आहे. सर्वात आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपला राजीनामा सादर केला आणि आता राज्य प्रदेश प्रभारी राजीनामा देत आहेत. आसामपासून पंजाबपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून राजस्थानपर्यंतचे दिग्गज नेत्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आतापर्यंत १३ वरिष्ठ नेत्यांनी आपला राजीनामा राहुल गांधींकडे पाठवला आहे.
राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण काही वृत्तांनुसार, राहुल अजूनही राजीनाम्यावर अडून आहेत. असंही म्हटलं जात आहे की राहुल यांनी काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांना आपली रिप्लेसमेंट शोधायला सांगितली आहे.
महाराष्ट्रात पक्षाचे प्रभारी अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची घोषणा केली. पंजाब काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार आणि आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी सोमवारी आपले राजीनामे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे पाठवले.