Aurangabad Loksabha 2019 : शिवसेनेचा गढ ढासळला , खैरेंना पराभूत करून वंचित-एमआयएमचे जलील विजयी

अखेरच्या फेरीतील मतदान
इम्तियाज जलील : 388458
चंद्रकांत खैरे : 383818
हर्षवर्धन जाधव : 282718
सुभाष झांबड : 91455
Total : 1195360
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी अतिशय कडवी झुंझ देत ४,६४० मतांनी शिवसेनेला ऐतिहासिक मात दिली . अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा ट्रॅक्टर जोरात चालल्यामुळे खैरे यांच्या मतांवर मोठा परिणाम झाला परिणामी शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, अंतिम फेरीअखेर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना 388458 मते मिळाली. तर चंद्रकांत खैरे यांना 383818 मते मिळाली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी जाधव यांना 282718 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना अवघी 91455 मतं मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत अखेर एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना जलील यांच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, औरंगाबादचा अधिकृत निकाल मात्र अद्याप जाहीर झालेला नसला तरी इम्तियाज जलील ४६४० इतक्या निसटत्या बहुमताने विजयी झाले आहेत .
शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी खैरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे येथे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे जाधव सुरुवातीच्या अनेक फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते तर खैरे तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र नंतर खैरे यांनी जाधव यांना मागे टाकले. संपूर्ण लढतीत खैरे यांनी एकदाच अवघ्या ८२४ मतांनी जलील यांच्यावर आघाडी घेतली. मात्र नंतर ही आघाडी मोडत जलील यांनी कधी पाच कधी सहा -सात हजारांवर मतांची आघाडी मिळवली पुढे ही आघाडी निर्णायक ठरून ते विजयी झाले.