टिक टॉक स्टार मोहित मोरच्या छातीत घातल्या १३ गोळ्या , लोकप्रियतेच्या आकसातून कृत्य केल्याचा संशय

नवी दिल्लीतील द्वारका मोड येथील दोन गटांमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या चकमकीत टिक टॉक स्टार मोहित मोर याचा मृत्यू झाला आहे. मोहित हा नजफगड येथे एका व्यायामशाळेत ट्रेनर म्हणून काम करत होता. मंगळवारी संध्याकाळी साडे चारच्या दरम्यान मोहित आपल्या मित्रांना भेटण्यासाठी फोटो स्टेटच्या दुकानात गेला होता. हे दुकान एका घरामध्ये आहे. याच दुकानावर गुंडांनी हल्ला करत मोहितवर गोळ्या झाडल्या.
परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फूटेजनुसार, हे गुंड पळत असल्याचे दिसत आहेत. यां पैकी दोघांनी हेल्मेट घातले आहे. गोळीबारानंतर ते पळून जात असल्याचेही फूटेजमध्ये दिसत आहे. हे टोळीयुद्ध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांकडे मोहितचे कोणत्याही स्वरुपाचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. परस्परांमधील संघर्षातूनच ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहित मोर लोकप्रिय होता. टिक टॉकवर त्याचे तब्बल ५ लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर देखील त्याचे ३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मोहितचा हरियाणी आणि बिनधास्त लुक लोकांना खूपच भावला आहे. मोहित नजफगडमध्ये एकटाच राहत असे.
मोहित सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय होता. त्याचे कुटुंब हरियाणातील बहादूरगड येथे राहते. कुटुंबात त्याची आई आणि मोठा भाऊ आहे. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मोहितची व्यायमशाळाही अतिशय लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असल्याचा फायदा त्याला मिळत असे. याच कारणामुळे आसपासच्या लोकांना त्याच्याबद्दल आकस होता. त्यातून त्यांच्यात वैर निर्माण झाले होते.