एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची सर्व संमतीने निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एनडीएचं नेतृत्व पुन्हा एकदा एकमुखाने सोपवण्यात आलं आहे. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत रितसर प्रस्ताव संमत करून या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मोदी यांच्या नेतृत्वावर सर्वच घटकपक्षांनी विश्वास व्यक्त केल्याचे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. बैठकीत मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा ठराव रामविलास पासवान यांनी मांडला. त्यात एनडीए ही खऱ्या अर्थाने देशाची स्वप्नं आणि आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्थापन झालेली आघाडी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एनडीएतील ३६ घटकपक्षांचे नेते भाजपने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. तीन मित्रपक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या तिन्ही पक्षांनी मोदींच्या नेतृत्वाचं समर्थन करणारं पत्र पाठवलं असून बैठकीत सर्वच मित्रपक्षांनी मोदींची स्तुती करत त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढील वाटचाल करण्यावर एकमुखी निर्णय दिला, असे राजनाथ यांनी पुढे नमूद केले.
मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचाही गौरव या ठरावात करण्यात आला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान ईव्हीएमवर जे प्रश्नचिन्ह लावले जात आहे, त्यावर पंतप्रधान मोदींनी बैठकीत चिंता व्यक्त केल्याचे राजनाथ यांनी सांगितले. एनडीएने विकासाचा वेग वाढवण्याचा प्रमुख संकल्प केला असून पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्धार असल्याचे राजनाथ यांनी पुढे नमूद केले.