कुणी निवडणुकीचे निकाल चोरण्याचा प्रयत्न करणार असेल तर मतरक्षणासाठी प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील : कुशवाह

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आयएलएसपी) नेते उपेंद्र कुशवाह यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘कुणी निवडणुकीचे निकालच चोरण्याचा प्रयत्न करणार असेल तर मतरक्षणासाठी आम्हाला शस्त्रे हाती घ्यावी लागतील’, अशी धमकी दिली आहे. बिहारमध्ये राजद कार्यकर्त्यांनी ईव्हीएमने भरलेली गाडी पकडली आहे. त्याबाबत विचारले असता कुशवाह यांनी केंद्र सरकार, बिहार सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
‘मतदान हे सर्वोच्च दान आहे. आपले जीवन आणि आपली प्रतिष्ठा जितकी महत्त्वाची आहे तितकंच लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्व आहे. त्यामुळे मतरक्षणासाठी गरज पडल्यास आम्ही शस्त्रे हाती घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे कुशवाह यांनी निक्षून सांगितले.
ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत अशाप्रकारे मतांची चोरी करून जिंकण्याचा विचार कुणी करत असेल तर त्यांनी वेळीच हा उद्योग बंद करावा अन्यथा जनतेत खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होईल. लोक शस्त्रे हाती घेतील. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील. भविष्यात जी स्थिती उद्भवेल त्याला सरकार आणि प्रशासनात बसलेल्या व्यक्तीच जबाबदार राहतील, अशी धमकीच कुशवाह यांनी दिली.