पवारांची माध्यमांवर नाराजी , मोदींची हिमालयवारी आणि एक्झिट पोल हे तर नाटक !!

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिमालयवारी आणि रविवारी सायंकाळी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलचा उल्लेख ‘नाटक ‘ असा करत जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत मरीन ड्राइव्ह येथील इस्लाम जिमखान्यावर आयोजित इफ्तार पार्टीला शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी देशातील सध्याच्या वातावरणावर परखडपणे भाष्य केले. सरकारमध्ये बसले आहेत त्यांनी लोकांच्या समस्यांचं निराकरण करणं अपेक्षित आहे मात्र सरकार चालवणारे आज राजधानी सोडून हिमालयात जावून बसले आहेत, असा सणसणीत टोला पवारांनी मोदींना लगावला.
एक्झिट पोलवर निशाणा साधताना काही वृत्तवाहिन्या सत्ताधारी पक्षाच्या हातातील ‘कठपुतली बाहुल्या’ बनल्या आहेत. काल संध्याकाळपासूनच त्यांची नौटंकी सुरू आहे. अनेक लोकांनी फोन करून माझ्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली. मात्र चिंता करण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होणार आहे, असे पवार पुढे म्हणाले.
निवडणूक आता संपली आहे. देश कोणत्या दिशेला जाणार, कोणत्या विचारांचे सरकार येणार, याची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. मात्र माध्यमांना मोठी घाई झाली आहे. त्यांच्याकडून एक वेगळाच ‘माहोल’ तयार केला जात आहे, अशा शब्दांत पवारांनी माध्यमांवरील नाराजी व्यक्त केली. आम्ही बंधुभाव अधिक वृद्धिंगत करण्यावर भर देत असताना काही लोक त्याविरुद्ध संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांना यश मिळणार नाही. देशातील वातावरण लवकरच बदलेल हा माझा विश्वास आहे. देशात बंधुभाव टिकून राहावा, हीच ‘दुवा’ मी अल्लाकडे मागेन, अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या.