केंद्रात पुन्हा एनडीएची सत्ता येणार नाही, अशोक चव्हाण यांना विश्वास

लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. रविवारी अखेरच्या टप्यातील मतदान पार पडल्यानंतर एग्झिट पोल समोर आले. एग्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजपाला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एनडीएची केंद्रात सत्ता येणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय, महाराष्ट्रात आघाडीला चांगले यश मिळेल असेही ते म्हणाले आहेत.
मतमोजणी २३ तारखेला आहे, त्यामुळे वस्तूस्थिती त्यावेळी स्पष्ट होईल. एग्झिट पोल म्हणजे केवळ एक अंदाज आहे, खरी स्थिती मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. केंद्रात एनडीएचं सरकार येणार नाही, परिवर्तन होण्याची शक्यता असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेस -राष्ट्रवादीसह आघाडीला २४ ते २५ जागा मिळतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
दानवेंना ३०० जागांचा विश्वास
दुसरीकडे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दानवे राज्यात ४२ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रात युतीला ४२ च्या वरच जागा मिळतील, ४१ होणार नाहीत. तसंच देशात भाजप ३०० जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल’, असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २२ जागा, शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या, दोघांना मिळून एकूण ४२ जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा आणि काँग्रेसला केवळ २ जागा्ंवर समाधान मानावं लागलं होतं.