दिल्लीतील मुस्लिम मतदारांविषयी हे काय बोलले केजरीवाल ?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालयांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. दिल्लीत मुस्लिमांनी शेवटच्या क्षणी आम्हाला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केलं. त्यामुळे आमचे मनसुबे उधळले गेले आहेत. मुस्लिम मते काँग्रेसकडे सरकली नसती तर आम्ही दिल्लीतील सातही जागांवर विजयी झालो असतो, असा दावा केजरीवाल यांनी केलाय.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी हा दावा केलाय. आम आदमी पार्टी सातही जागांवर विजयी होईल असं आम्हाला मतदानाच्या ४८ तास आधी वाटत होतं. मात्र ऐनवेळी मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं. नेमकं असं का झालं हे जाणून घेण्याचा आम्हीही प्रयत्न करत आहोत, असं केजरीवाल यांनी सांगितलं. दरम्यान, केजरीवाल यांच्या वक्तव्यावर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी सडकून टीका केली आहे. केजरीवाल यांना नेमकं काय म्हणायचं आहे हेच कळत नाही. नागरिकांना कोणत्याही पक्षाला मतदान करण्याचा हक्कच आहे, असं सांगतानाच दिल्लीकरांना केजरीवाल यांचं गव्हर्नन्स मॉडल काही समजलेलं नाही आणि पसंतही पडलेलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.