लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी वाराणसी सहित ५९ जागांसाठी उद्या मतदान

लोकसभा निवडणूक २०१९ च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील ५९ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. या ५९ जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी येथील जागेचाही समावेश आहे. या अंतिम टप्प्याचा प्रचार २४ तास आधीच संपला आहे. पण नेत्यांच्या भेटीगाठी मात्र जोरावर आहेत. शनिवारी पंतप्रधान मोदी आपल्या शपथविधीचा तयारी करून केदारनाथ येथे दर्शन आणि ध्यानधारणेसाठी रवाना झाले तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीत बैठका घेत होते. तेलगु देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी संभाव्य निकालांनंतरची रणनिती आखायला सुरुवात केली आणि राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, मायावती या नेत्यांची भेट घेतली.
रविवारी ८ राज्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार ९१८ उमेदवारांचे भाग्य इव्हीएममध्ये बंद करणार आहेत. १.१२ लाख मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पंजाब (१३), उत्तर प्रदेश (१३), पश्चिम बंगाल (९), बिहार (८), मध्य प्रदेश (८), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (४), चंदीगड (१) या राज्यांत मतदान होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीसह, शत्रुघ्न सिन्हा यांचा पाटणा साहिब, सनी देओल यांचा गुरदासपूर हे मतदारसंघ रविवारी होणाऱ्या मतदानात महत्त्वाचे मानले जात आहेत.
शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहिब मतदारसंघातून मागील निवडणुकीत निवडून आले, मात्र तेव्हा ते भाजपत होते. आता ते काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्यासमोर भाजपचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे आव्हान आहे.