निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकमध्ये ” मोदी-शहा ” क्लीन चिट वरून मतभिन्नता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिलेल्या क्लीन चीटवरुन निवडणूक आयोगात मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून ही नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. तर, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी वादाच्या चर्चेवर खुलासा करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान काँग्रेसने निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातील खेळणे झाले असल्याचे अशोक लवासा यांच्या पत्रावरुन स्पष्ट होत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारात आरोप-प्रत्यारोप झडत असताना सत्ताधारी-विरोधकांनी परस्परांविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधातही तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना क्लिन चीट देण्यात आली होती तर, विरोधकांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी क्लीन चीटवर आक्षेप घेतले आहेत. क्लीन चीट देण्याच्या निर्णयाबाबत आयोगातील आयुक्तांमध्ये असलेली मतभिन्नता रेकोर्डवर घेण्याची मागणी अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाच्या निर्णय प्रक्रियेसारखी निर्णय प्रक्रिया असावी अशी मागणी लवासा यांनी केली आहे. त्यामुळे अल्पमतातील मुद्दे रेकोर्डवर येतील असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. लवासा यांच्या पत्रामुळे निवडणूक आयोगात सर्व आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगात तीन आयुक्त असतात आणि तिघेही जण एकमेकांचे क्लोन नसतात असे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटले. आपण सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची आपली तयारी आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असल्याचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.