अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेकडून चूक झाली आणि मित्र पक्षाचेच १७ पोलीस ठार झाले !!

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेकडून झालेली एक गंभीर चूक समोर आली आहे. अमेरिकेच्या लष्कराने दहशतवादी समजून स्वत:च्या मित्रावरच बॉम्ब टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेच्या या चूकीमुळे १७ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानमधील हेलमंड प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करताना अमेरिकेने अफगाण पोलिसांवरच चुकून बॉम्ब टाकला. या हल्ल्यात अफगाण पोलीस दलातील १७ कर्मचारी ठार झाले आणि अन्य १४ जण जखमी झाले. हेलमंड प्रांताचे प्रमुख अताउल्लाह यांनी दिलेल्या माहितीनुसार नाहर-ए-साराज जिल्ह्यात ही घटना घडली. अफगाण सुरक्षा दल आणि तालिबानी दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. या चकमकीवेळी अमेरिकेच्या हवाई दलाची मदत मागण्यात आली होती.
दहशतवाद्यांना सुरक्षा चेक पोस्टच्या मागे हटवण्याचे प्रयत्न सुरु असताना अमेरिकेच्या हवाई दलाने बॉम्ब टाकला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे काहीच नुकसान झाले नाही. पण अफगाण पोलीस दलातील १७ कर्मचारी मारले गेले. हेलमंड प्रांताचे गव्हर्नर उमर ज्वाक यांच्या प्रवक्त्याने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यासंदर्भात तालिबानी नेता युसूफ अहमदी याने असा दावा केली की, अमेरिकेच्या हल्ल्यात ३५ पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. त्यात चार कमांडर देखील आहेत.