प्रचार दौरे संपल्यानंतर नरेंद्र मोदी रमले देव दर्शनात , केदारनाथ केला मंदिरात रुद्राभिषेक

#WATCH Prime Minister Narendra Modi reviews redevelopment projects in Kedarnath. #Uttarakhand pic.twitter.com/cFMH9PqVyC
— ANI (@ANI) May 18, 2019
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला. मागील दोन वर्षात पंतप्रधान मोदींनी केदारनाथ येथे चार वेळेस भेट दिली आहे. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी केदारनाथ येथे दाखल झाले. पंतप्रधानांचा हा दोन दिवसीय दौरा आहे. पांरपरिक गढवाली पोषाख, कमरेला भगवा गमछा आणि पहाडी टोपी घालून पंतप्रधान मोदी केदारनाथ येथे दाखल झाले.
केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर यावेळी पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला. महापूरानंतर केदारनाथ येथे सुरू असलेल्या पुर्नविकासाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. केदारनाथ येथे रात्री मुक्काम केल्यानंतर पंतप्रधान रविवारी सकाळी बद्रीनाथ येथे पोहचणार आहेत. त्यानंतर रविवारीच दिल्लीत परतील. लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश आहे.