पुन्हा एकदा पिवळ्या साडीतल्या रीना द्विवेदी आणि त्यांना जायचंय आता बिग बॉस मध्ये …

आठवडा उलटला तरी पिवळी साडी घातलेल्या महिलेची चर्चा अद्यापही चालूच आहे . सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या पीडब्ल्यूडी खात्यातील महिला अधिकारी रीना द्विवेदी यांना नव्याने मिळालेले सेलिब्रिटी स्टेटस कायम टिकवायचे आहे. रीना यांनी रिएॅलिटी शो बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संधी मिळाली तर पुढच्या सीझनमध्ये आपल्याला बिग बॉसच्या घरात जायला आवडेल असे त्यांनी सांगितले.
माझ्या कुटुंबाचा मला पूर्ण पाठिंबा असून मला ओळख मिळतेय त्याचा त्यांना आनंदच आहे. बिग बॉस माझ्यासाठी एक मोठी संधी असेल असे रीना यांनी सांगितले. रीना पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. रीना यांचे पिवळ्या साडीतील दोन्ही हातात इव्हीएम घेऊन जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली.
निवडणुकीच्या या धामधुमीत सोशल मीडियावर त्यांच्या फोटोचीच चर्चा होती. त्यांचे फोटो फेसबुक, व्हॉट्स अॅपवर मोठया प्रमाणात शेअर झाले. प्रसिद्धी मिळाल्यानंतर रीना यांचे आयुष्य पहिल्यासारखे राहिलेले नाही. रीना यांना एक मुलगा असून तो नवव्या इयत्तेत आहे.