येत्या काही वर्षात भाजप श्री श्री गोडसेला भारतरत्न देण्याचीही शिफारस करेल : ओवैसी

भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. या विधानाचा आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही खरपूस समाचार घेतला आहे. ओवैसींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. काही वर्षांनी श्री श्री गोडसेला भारतरत्न देण्याचीही शिफारस भाजपा करेल, असं ओवैसी म्हणाले आहेत.
ओवैसी म्हणतात, नरेंद्र मोदींनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीचा बचाव आणि समर्थन केलं आहे. हे काही साध्वीचं व्यक्तिगत मत नाही. भाजपा पक्ष हा स्वतंत्र भारतातल्या पहिल्या दहशतवाद्याबरोबर आहे. येत्या काही वर्षांत श्री श्री गोडसेचं नाव भारतरत्नासाठी देण्याची भाजपा शिफारस करेल, असं ओवैसी म्हणाले आहेत. त्यांनी ट्विटवर व्हिडीओ पोस्ट करत ममता बॅनर्जी यांचं समर्थन केलं आहे.
कोलकात्यात सुरू असलेल्या वादाला भाजपाच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्येही निष्पक्ष निवडणूक होण्याची मागणी केली जात आहे. फक्त पश्चिम बंगालमध्येच असं का होतंय. पूर्ण सात टप्प्यांमध्ये असं झालं पाहिजे, असंही ओवैसी म्हणाले आहेत.