जम्मू-काश्मीर पेक्षाही पश्चिम बंगालची परिथिती अधिक चिंताजनक : नरेंद्र मोदी

पश्चिम बंगालच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधल्या निवडणुका जास्त शांततापूर्ण झाल्या. हिंसा आणि दहशतवादाचा विषय आल्यास काश्मीरचं नाव येतं. परंतु त्याच काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान 30 हजार लोक बाहेर पडले होते. त्यावेळीसुद्धा एवढी हिंसा झाली नाही. पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचार चालू असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना केली.
यावेळी ममता बॅनर्जी यांना टार्गेट करताना मोदी म्हणाले कि , जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवतात आणि तटस्थ राहतात, त्यांचं मौनही फारच चिंताजनक आहे. कारण काहींचा पूर्ण कार्यकाळ मोदींच्या विरोधात द्वेष पसरवण्यात गेला. त्यामुळेच देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हिंसा आणि दहशतवाद म्हटल्यास पहिलं नाव काश्मीरचं येतं. परंतु काश्मीरमधल्या पंचायत निवडणुकीतही एवढी हिंसा झालेली नाही. तर दुसरीकडे बंगालच्या पंचायत निवडणुकीत शेकडो लोक मारले गेले आहेत.
जे जिंकून आलेत, त्यांची घरं जाळण्यात आली आहेत. त्यांना झारखंड किंवा अन्य राज्यांत जाऊन 3-3 महिने लपून राहावं लागतं आहे. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की ते निवडणुकीत जिंकले आहेत. त्यावेळी लोकशाहीची भाषा करणारे लोक मूग गिळून गप्प होते. भाजपा याविरोधात आवाज उठवत होता. तिथे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टरही उतरवू दिलं नाही. शेवटच्या क्षणी सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले असंही मोदी म्हणाले आहेत.