पंतप्रधान पदासाठी आता मोदी नव्हे, मीच योग्य : बसपा नेत्या मायावती यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे. या संदर्भात लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन देश चालवण्यासाठी मोदी अनफिट असून मीच फिट आहे असा दावा त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांसाठी सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.
या पत्रकार परिषदेत मायावती पुढे म्हणाल्या कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त कागदावर प्रामाणिक आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामध्ये ते ओबीसी आहेत हे म्हणण्याइतकंच तथ्या आहे. वास्तवात ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत. माझ्याहून जास्त काळ मुख्यमंत्री राहिले असूनसु्द्धा मोदी यांची राजकीय कारकीर्द भाजपसाठी एक कलंक आहे. पंतप्रधानपदाचे काम सांभाळण्यात ते अयशस्वी झाले आहेत. देश चालवण्याासाठी मोदी पूर्णपणे अनफिट आहेत. मी मात्र देश चालवण्यासाठी योग्य उमेदवार आहे.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. २३ मेला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
यावेळी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले नाही तर तिसऱ्या आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीत प्रादेशिक पक्षांचे आणि नेत्यांचे महत्त्व प्रचंड वाढणार आहे. त्यामुळेच मायावती यांच्या पंतप्रधानपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. आपल्या प्रचारसभांमध्ये मायावती त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची वारंवार आठवणही करून देत आहेत. तसंच मोदींच्या टीकेला चोख प्रत्युत्तरही देत आहेत. ‘मोदी माझ्या पक्षाला बहनजी संपत्ती पार्टी म्हणत आहेत. पण माझ्याकडे लोकांच्या शुभेच्छांशिवाय दुसरी कोणतीच संपत्ती नाही. जर काळ्या पैशाचा हिशोब केला तर सर्वाधिक काळा पैसा भाजपच्या भ्रष्ट नेत्यांकडेच सापडेल’. तसंच दलितांची प्रगती मोदींना पाहवत नाही असा आरोपही मायावती यांनी केला आहे.