एस्कॉर्ट वाहनाची व्यवस्था न केल्याने मोदींच्या संतप्त भावाचे पोलीस ठाण्यासमोरच धरणे

जयपूर पोलिसांनी पुरेशी सुरक्षा कर्मचाऱ्यांना स्वतंत्र वाहन न दिल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांनी पोलीस ठाण्याबाहेरचं धरणे धरले. काल (मंगळवारी) रात्री ही घटना घडली. प्रल्हाद मोदी उदयपूरहून जयपूरला दाखल झाले. पोलिसांनी आपल्याला एस्कॉर्ट वाहन न दिल्याचं मोदी म्हणाले. पोलीस सुरक्षेसाठी स्वतंत्र वाहन देत नसल्यानं त्यांनी बागरु पोलीस ठाण्याबाहेर धरणे धरले . दरम्यान जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि , ‘दोन पीएसओ बागरु पोलीस ठाण्यात मोदींची वाट पाहत होते. नियमानुसार त्यांनी मोदींच्या गाडीतूनच प्रवास करायला हवा. आम्ही याबद्दलचे आदेशदेखील मोदींना दाखवले. ज्या व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते, त्याच व्यक्तीच्या वाहनातून पीएसओंनी प्रवास करायचा असतो. मात्र प्रल्हाद मोदींनी पीएसओंना त्यांच्या गाडीत घेण्यास नकार दिला. पीएसओंना स्वतंत्र वाहन देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती,’ असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.
‘मी कुठेही जातो, तेव्हा मला राज्य सरकारकडून एस्कॉर्ट वाहन दिलं जातं. पण जयपूरच्या पोलीस आयुक्तांना माझ्यापासून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काहीतरी अडचण असावी. त्यामुळेच त्यांनी मला स्वतंत्र एस्कॉर्ट वाहन देण्यास नकार दिला,’ असं प्रल्हाद मोदी म्हणाले. पोलीस आयुक्तांनी माझ्या सुरक्षेसाठी केवळ दोन पोलीस दिले आणि त्यांना माझ्यासोबत माझ्याच गाडीतून प्रवास करण्यास सांगितलं, असा दावादेखील त्यांनी केला. माझ्यासोबत माझं कुटुंब प्रवास करत असल्यानं गाडीत जागाच नाही, असं मोदींनी माध्यमांना सांगितलं.