Video : मोदींच्या रोड शो मध्ये रामाचा जिवंत देखावा… मोदी-शहांचे पोस्टर काढल्याने भाजप-टीएमसीमध्ये धर्मयुद्ध !!

#WATCH Visuals from Bharatiya Janata Party (BJP) President Amit Shah's roadshow in Kolkata. #WestBengal pic.twitter.com/xmXxFeu8j0
— ANI (@ANI) May 14, 2019
भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे . परिणामी अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रोडशोच्या काही तास आधी मोदी शहांचे पोस्टर्स काढून टाकण्यात आले आहेत. त्यांच्या रोडशोमध्ये रामाचा जिवंत देखावा,नृत्य आदींचे आयोजन केल्यामुळे त्यांच्या प्रचाराला धर्म युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऊत्तर प्रदेशनंतर भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला आहे.
आज अमित शहांचा उत्तर कोलकात्यामध्ये रोड शो होता. या रोड शोच्याआधी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मोदी आणि शहांचे रस्त्यारस्त्यावर लावलेले पोस्टर फाडले आहेत. हे पोस्टर्स फाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजप आणि तृणमूलच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. बंगालमध्ये ममता दीदींनी लोकशाही संपवली आहे असा आरोप बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. मंगळवारी अमित शहांचे हेलिकॉप्टर जाधवपूर येथे लॅंड करायला काही तास आधी परवानगी नाकारण्यात आली होती. तसंच भाजप उमेदवार बाबुल सुप्रियोंच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी हल्लाही करण्यात आला होता. १५ मेला हावड्याला होणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेलाही आज परवानगी नाकारण्यात आली आहे.
भाजपच्या प्रचारसभांमध्ये तृणमूल अनेक अडथळे निर्माण करत आहेत असा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे तृणमूलचे नेतेही गप्प बसलेले नाहीत. केंद्रीय सुरक्षादलाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना भाजप पाठवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यात ९ जागांसाठी मतदान होणार आहे. तेव्हा यावेळी ममता बॅनर्जी बंगालचा गड राखतात की भाजप प्रदेशात मुसंडी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.