नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांचे सरकार १३, १५ दिवस टिकेल : शरद पवारांचे भाकीत

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवस टिकेल, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारयांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच धमाका केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे तर २३ मे रोजी लोकसभेच्या महासंग्रामाचा निकाल हाती येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रात मोदी सरकारविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यात सर्वात आघाडीवर असलेल्या ‘पॉवरफुल’ पवारांनी केलेल्या भाकिताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप विरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या २१ मेपर्यंत त्याचं प्रत्यक्ष स्वरूप तुमच्यापुढे येईल, असेही पवारांनी नमूद केले. पवार एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
भलेही भाजप म्हणेल आम्हाला ५०० जागा मिळतील पण भाजपचा अंदाज चुकला आहे हे नक्की. गेल्या आठ महिन्यांत भाजपच्या हातून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही राज्ये गेली आहेत. त्यावरून वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत, हे कळतं. भाजपला राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळालं तरी येणारं सरकार १३ किंवा १५ दिवसांचं असेल. भाजपला बहुमताची अग्निपरीक्षा पार करता येणार नाही. देशाला नवा पर्याय देण्याचं मन आणि मत सर्वच विरोधी पक्षांनी बनवलं आहे. त्यामुळे समविचारी पक्ष एकत्र बसून नेतृत्वावर एकमताने निर्णय घेतील. तिथे सर्वांच्या मताचा आदर होईल. कोणताही घोडेबाजार होणार नाही. आम्ही स्थिर सरकार देऊ. ही मोट बांधण्याची जबाबदारी मी निभावेन. असेही पवार म्हणाले.