राफेल लढाऊ विमान खरेदी कराराची गोपनीय कागदपत्रं गहाळ, अंतर्गत चौकशी चालू असल्याची माहिती

राफेल लढाऊ विमान खरेदी कराराची गोपनीय कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे. माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) माहिती मिळाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआय दाखल करत गहाळ झालेल्या कागदपत्रांसंबधी आणि त्यासंबंधी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सुरक्षा खात्याकडून ही चौकशी केली जात आहे.
अनिल गलगली यांनी यावेळी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांना कागदपत्रं गहाळ झाल्याची कल्पना होती का ? आणि जर होती तर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती की नव्हती ? यासंबंधी विचारणा केली होती. सुशील कुमार यांनी अनिल गलगली यांच्या आरटीआयला उत्तर दिलं असून, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अंतर्गत चौकशीचा आदेश दिला असल्याची माहिती दिली. सुरक्षा नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अनिल गलगली यांनी सांगितलं आहे की, ‘प्रकरण न्यायप्रलंबित असल्याने सरकार सविस्तर माहिती देत नसावं. पण आता वेळ आली आहे की, सरकारने पुढे येऊन नागरिकांना नेमकं काय झालं आहे याची माहिती द्यावी. अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे’.
अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी मार्च महिन्यात पीटीआयला सांगितलं होतं की, राफेल करारासंबंधी कागदपत्रं केंद्रीय सुरक्षा मंत्रालयातून चोरी गेलेली नव्हती. तसंच याचिकाकर्त्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यासाठी वापरलेली कागदपत्रं ही मूळ नसून त्यांची प्रत आहे.