अमित शहा यांच्या कोलकातातील रोड शो दरम्यान शहांच्या दिशेने भिरकावल्या लाठ्या , पोलिसांचाही लाठी चार्ज

#WATCH: Visuals after clashes broke out at BJP President Amit Shah's roadshow in Kolkata. #WestBengal pic.twitter.com/laSeN2mGzn
— ANI (@ANI) May 14, 2019
भाजपचे राष्ट्रीय अमित शहा यांच्या कोलकातातील रोड शो दरम्यान शहा यांच्यादिशेने काठी भिरकावण्यात आल्याने जोरदार संघर्ष पेटला असून गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. अमित शहा यांच्या रोड शोसाठी आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. कोलकाता विद्यापीठ मार्गावरून अमित शहा यांचा ताफा जात असताना भाजप आणि माकपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे ‘पीटीआय’ने म्हटले आहे.
दरम्यान, शहा यांचा ताफा कोलकातातील बिधान सराई भागातील कॉलेज हॉस्टेलजवळून जात असताना शहा ज्या ट्रकवर होते त्या ट्रकच्या दिशेने काठ्या भिरकावण्यात आल्या. हॉस्टेलमधून शहा यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली. त्यानंतर तणाव निर्माण झाला असून भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्टेलच्या इमारतीला घेराव घालत हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे जाळपोळही झाल्याची दृष्ये हाती येत आहेत.
दगडफेकीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसह काही पत्रकारही जखमी झाले आहेत. विद्यासागर कॉलेजमधील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही जमावाने तोडफोड केली. अमित शहा एका ट्रकवर उभे होते. त्यांच्या दिशेने लाठ्या भिरकावण्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिहल्ला केला. कॉलेज हॉस्टेलच्या ज्या इमारतीतून दगडफेक करण्यात आली त्या इमारतीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असून इमारतीबाहेर जाळपोळही करण्यात आली आहे.