तीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणी जम्मू काश्मीरच्या बंदिपुरा जिल्ह्यात तणाव

जम्मू काश्मीरमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला असून खोऱ्यात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बंदिपोरा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच लोक रस्त्यावर उतरले असून परिसरातील शाळा आणि दुकानं बंद करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनांमुळे तणाव असून आंदोलकांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनामुळे वाहतूक सेवेलाही फटका बसला आहे. मात्र सरकारी कार्यालयं आणि बँका नेहमीप्रमाणे सुरु आहेत. ९ मे रोजी बंदिपोरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक गठीत केलं आणि वेगाने तपास करत आरोपीला अटक केली. चिमुरडीवर झालेल्या बलात्काराचा निषेध करत काश्मीर खोऱ्यात बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, राजकीय पक्ष आणि फुटीरवादी संघटनांनीदेखील बलात्काराचा निषेध करत आरोपीला कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.
कुटुंबाने केलेल्या तक्रारीनुसार, इफ्तारच्या काही वेळ आधी मुलीवर बलात्कार करण्यात आला. नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवलं आणि अपहरण करुन बलात्कार केला. मुलगी जवळच्या परिसरात कुटुंबाला सापडली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी ताहीर अहमद मीर या आरोपीला अटक केली आहे. पण जेव्हा स्थानिक शाळेने आरोपीच्या जन्म दाखल्यावर फेरफार करत त्याला अल्पवयीन दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिकांनी निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वैद्यकीय चाचणीच्या आधारे आरोपीच्या वयाची माहिती घेतली जाईल असं सांगितलं आहे.