साखळी बॉम्बस्फोटांच्या हादऱ्यानंतर श्रीलंकेत धार्मिक दंगलीची बाधा , रात्रीच्या वेळी संचारबंदी

साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरल्यानंतर सुरक्षादलांनी कट्टरपथींविरुद्ध व्यापक कारवाई हाती घेतली असतानाच देशाच्या विविध भागांत मुस्लीमविरोधी दंगली उसळल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण श्रीलंकेत आजपासूनच रात्रीच्या वेळी ८ तासांची संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे.
राजधानी कोलंबोच्या उत्तरेकडे असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दंगली उसळल्या आहेत. ख्रिश्चनांच्या जमावाने मुस्लीम व्यापाऱ्यांवर हल्ला चढवला तसेच काही मशिदींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. त्यानंतर आधी तीन जिल्ह्यांत आणि नंतर देशभरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील बहुसंख्यक सिंहली समुदाय आणि अल्पसंख्यक मुस्लीम धर्मीय असा संघर्ष उसळला असून स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या वापरावरही निर्बंध घातले आहेत.
दरम्यान, २१ एप्रिल रोजी ईस्टर संडेचा दिवस निवडून दहशतवाद्यांनी तीन चर्च तसेच तीन तारांकित हॉटेलांमध्ये बॉम्बस्फोट घडवले होते. या आत्मघाती हल्ल्यात २५३ जणांचा बळी गेला होता तर ५ हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर देशभरात प्रक्षुब्ध भावना असून त्याचेच पडसाद उमटताना दिसत आहेत.