आजारी असताना इलेक्शन ड्युटी केल्याने महिला कर्मचार-याचा मृत्यू झाल्याची कुटुंबियांची तक्रार

मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रिती अत्राम-धुर्वे यांचा आज मृत्यू झाला. आजारी असतानाही बळजबरीने लोकसभा निवडणुकीचं काम करायला लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी केला आहे.
प्रिती अत्राम धुर्वे यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांना १८ एप्रिल रोजी कावीळ झाली होती. यामुळे रजेसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज केला होता. मात्र शिवडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची रजा मंजूर केली नाही. त्यामुळे कावीळ असूनही त्यांना दहा दिवस उन्हात काम करावे लागले. परिणामी त्यांना २९ एप्रिल रोजी मुंबईतील मतदानाच्या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने प्रिती यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नायर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचार सुरु असताना आज त्यांचा मृत्यू झाला.