आम्ही महामिलावटी नाहीत तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच महामिलावटी , त्यांचे बुरे दिन सुरु झालेत : मायावती

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन संपले असून आता बुरे दिन सुरु झालेत’, अशा शब्दांत बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी मोदींवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातील आझमगड येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादवही उपस्थित होते.
मायावती म्हणाल्या , पहिल्या पाच टप्प्यातील निवडणुकांमधून हे दिसून आलंय की दिवसेंदिवस महाआघाडीच्या जिंकण्याची शक्यता वाढतच आहे. उर्वरीत दोन टप्प्यांमध्येही विरोधकांच्या पसंतीत वाढच होणार आहे. सपा-बसपा-आरएलडीच्या युतीमुळे भाजपा नेत्यांची झोप उडाली आहे.
पंतप्रधान मोदी वारंवार महाआघाडीला महामिलावटी असे संबोधत आहेत. यावरुन मायावतींनी मोदींवर पलटवार केला. आम्ही महामिलावटी नाहीत तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच महामिलावटी आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. तसेच भाजपा आणि काँग्रेसवर टीका करताना हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही पक्षांचं वागणं आणि चारित्र्य एकसारखचं असल्याचे मायावती यावेळी म्हणाल्या.
मोदी महाआघाडीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र, मतदार मोदींच्या या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करताना मोदींचे अच्छे दिन आता संपले असून वाईट दिवस सुरु झाले आहेत, अशा शब्दांत मायावतींनी त्यांच्यावर टीका केली.