पंतप्रधान पदासाठी आपण राहुल गांधींपेक्षा मायावतींना निवडू पण शरद पवारांना निवडणार नाही : प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान वैयक्तिक टीका करतात म्हणजे निवडणूक मोदींच्या हातातून निसटत चालल्याचे लक्षण
लोकसभा निवडणुकांच्या निकालाची प्रतिक्षा असताना आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुक ही स्वतंत्र लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमान या पक्षासह जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत.
भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुढच्या चार महिन्यांमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात बोलताना जाहीर केलं.
लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८जागा स्वबळावर लढविणार असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले, मात्र प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या जागांची पूर्तता न करु शकल्याने ही आघाडी होऊ शकली नाही. आता मात्र कुठल्याही चर्चेच्या अगोदरच प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
सोलापूरमध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पंतप्रधान पदासाठी आपण राहुल गांधींपेक्षा मायावतींना निवडू पण शरद पवारांना निवडणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर यावेळी त्यांनी मोदींवरही निशाणा साधला. मोदींचा तोल सुटला असावा म्हणून त्यांनी राजीव गांधींवर टीका केलं असं आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान वैयक्तिक टीका करतात म्हणजे त्यांना निवडणूक मोदींच्या हातातून निसटत चालली आहे. अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.
भाजप येणार भाजप येणार असा जो धोशा लावला जातोय त्याचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे. वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील यावर आम्ही मान्यता प्राप्त पार्टी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र मार्केटिंग करत नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला होता.