मुलगा डिएड पण नोकरी नाही, मजुरीची कामेही मिळेनात, महिलेची आत्महत्या

चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील संगीता अशोक फसले (वय ४२) या मजूर काम करणाऱ्या महिलेने मुलाची बेरोजगारी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली. मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होत्या. त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नव्हते. डीएडचे शिक्षण पूर्ण होऊनही मुलगा बेरोजगार होता. त्याला नोकरी मिळत नव्हती आणि कामही नव्हते. पती दुसऱ्याच्या घरी मिळेल ते काम करत होते. दुष्काळी परिस्थितीत त्यांना मजुरीची कामेही कमी झाली होती. उपलब्ध उत्पन्नातून घराचा खर्च भागत नव्हता. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येत होती. या परिस्थितीला कंटाळून संगीता फसले यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या कारणाला सरकारी यंत्रणेकडून अद्याप दुजोरा मिळाला नाही, मात्र फसले कुटुंबियांना पूर्वीपासून ओळखणाऱ्या ग्रामस्थांमध्ये यासंबंधी चर्चा सुरू होती.