अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अयोध्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. ८ मार्च रोजी मध्यस्थी प्रक्रियेचा आदेश दिल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ सुनावणी घेणार आहे.
मार्च महिन्यात या घटनापीठाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद तोडग्यासाठी मध्यस्थीसाठी पाठवला होता. यासाठी कोर्टाने ३ सदस्यीय पॅनेलचीही स्थापना केली होती. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला यांच्यासह आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश होता. या पॅनेलने ८ आठवड्याच्या आत सुनावणी पूर्ण करायची होती. आतापर्यंत पॅनेलच्या कोणत्याही सदस्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.