राहुल गांधींकडून ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी

‘चौकीदार चोर’ है या घोषणेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी कोर्टाने खडसावल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे. दरम्यान, राफेलप्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. तत्पूर्वी घडलेली ही घडामोड महत्वाची मानली जात आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार चोर है अशी घोषणा दिली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राफेलप्रकरणी यापूर्वी केंद्र सरकारला फटकारले होते. मात्र, कोर्टाच्या या निकालाचा दाखला देताना राहुल गांधी यांनी कोर्टानेही चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता. तसेच राहुल यांच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण निवडणुकांच्या प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केले असल्याचे सांगत दोन वेळा चुकीबाबत केवळ खेद व्यक्त केला होता. मात्र, आज राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्यावतीने बिनिशर्त माफी मागितली.