कुरुक्षेत्रावरून मोदींचा विरोधकांवर प्रतिहल्ला !! ‘रावण, साप, विंचू, घाणेरडा माणूस, मौत का सौदागर, हिटलर आणि मुसोलिनी म्हणून मला शिव्या देतात , प्रेम करण्याची हीच पद्धत आहे का?

औरंगजेब, रावण, हिटलर, दुर्योधन आणि गंगू तेली… असं हिणवणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाभारत ज्या भूमीवर घडलं, त्या कुरुक्षेत्रावरून प्रतिहल्ला चढवला. ‘रावण, साप, विंचू, घाणेरडा माणूस, मौत का सौदागर, हिटलर आणि मुसोलिनी म्हणत मला शिव्या देण्यात आल्या. माझे वडील कोण आहेत? असं विचारत माझ्या आत्मसन्माला धक्का लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पंतप्रधान झाल्यानंतरच मला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. माझ्यावर अन्याय करण्यात आला,’ असा संताप व्यक्त करत मोदींनी विरोधकांवर पलटवार केला. त्यांची हि प्रेम करण्याची हीच पद्धत आहे का?
कुरुक्षेत्र येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेतला. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी मनमानी करू देत नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराला मी लगाम घालतो, त्यांच्या घराणेशाहीवर तुटून पडतो, त्यामुळे हे लोक वारंवार माझ्यावर टीका करत आहेत. साळसूदपणाचा आव आणून मला शिव्या घालत आहेत. याच लोकांनी भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप मोदींनी केला.
मी पंतप्रधान झालो, हे अनेकांना पाहवंल नाही. त्यांनी माझी मूर्ख पंतप्रधान म्हणून संभावना केली. मला जवानांच्या टाळूवरचं लोणी खाणारा दलाल म्हटंल गेलं. गद्दाफी, मुसोलिनी, हिटलरसारखे शब्द वापरून मला हुकूमशहा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही लोकांनी मला मनोरुग्ण तर काही लोकांनी नीच म्हटलं. माझे वडील कोण होते? माझे आजोबा कोण होते? असे सवालही त्यांनी केले, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या एका मंत्र्याने मला व्हायरस म्हटलं, तर दुसऱ्याने दाऊद म्हटलं.
काँग्रेसचे नेते ज्यांच्यासमोर नतमस्तक होतात, त्यांनी तर माझी “मौत का सौदागर” म्हणून संभावना केली. त्यांची प्रेम करण्याची हीच पद्धत आहे का? काँग्रेसच्या डिक्शनरीतील हेच ते प्रेमाचे बोल आहेत, असा हल्ला चढवतानाच समझोता एक्सप्रेसमध्ये ब्लास्ट झाल्यावर त्यांनी ‘हिंदू दहशतवाद’ ही संकल्पना रुढ करण्यासाठी निरपराध लोकांना अनेक वर्ष तुरुंगात सडवलं. मात्र काँग्रेसच्या या षडयंत्राचा पर्दाफाश झालाच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बालाकोट नंतर आमच्या एका वीरपुत्राला पाकिस्तानने पकडले होते. ४८ तासांच्या आत पाकिस्तानला त्यांना सोडावे लागले. ते वाघा बॉर्डपर्यंत सोडायला आले. तेव्हा काँग्रेसच्या भाटांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं. पाकच्या पंतप्रधानांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणीही याच काँग्रेसवाल्यांनी केली होती, अशी टीकाही त्यांनी केली.