अपयश झाकण्यासाठी नरेंद्र मोदी माझ्या नावाचा वापर करत आहेत – रॉबर्ट वढेरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रकारे आपल्यावर टीका करत आहेत ते पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याचं युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी म्हटलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबी, बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवर भाष्य न करता त्यांच्या प्रचारसभांमधून माझ्यावर ज्याप्रकारे हल्ला करत आहेत ते पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे’, असं रॉबर्ट वढेरा यांनी म्हटलं आहे.
जनतेच्या आशिर्वादाने हा चौकीदार शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी कोर्टाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून पुढील पाच वर्षांमध्ये त्यांना तुरुंगात टाकू, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट वढेरा यांना दिला आहे.
‘सभांमध्ये माझं नाव ऐकून मला धक्का बसला आहे. गरिबी, बेरोजगारी, महिला सक्षमीकरणसारेखे अनेक महत्त्वाचे मुद्दे असतानाही तुम्ही इतर सर्व मुद्दे सोडून फक्त माझ्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतलात’, असा टोला रॉबर्ट वढेरा यांनी लगावला आहे. रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही टीका केली आहे.
रॉबर्ट वढेरा यांनी मोदी सरकार आणि तपास यंत्रणांकडून आपला मानसिक छळ होत असल्याचाही आरोप केला आहे. ‘गेल्या पाच वर्षात तुमच्या सरकारकडून माझा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. तपास यंत्रणा, न्यायालयं आणि कर विभागाकडून फक्त माझ्यावर मानसिक दबाव टाकण्यासाठी वारंवार नोटीस पाठवण्यात आली’, असा आरोप रॉबर्ट वढेरा यांनी केला आहे. माझ्याविरोधात एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं अपयश लपवण्यासाठी वारंवार आपल्या नावाचा वापर करणं बंद करावं असं म्हटलं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आपल विश्वास असल्याचंही ते म्हणाले आहेत. ‘माझं नाव वारंवार घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे याचा विचार करत आहे. कृपया माझ्यावरील वैयक्तिक हल्ला थांबवा. माझ्यावर टीका करत तुम्ही न्यायव्यवस्थेचा अपमान करत आहात’, असं रॉबर्ट वढेरा यांनी सांगितलं आहे.