५० कोटी दिले तर मोदींना मारतो हे वक्तव्य आपलेच पण नशेत केलेले : तेजप्रताप यादव

वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ‘तुम्ही मला ५० कोटी द्या, मी मोदींना मारतो’, असे आक्षेपार्ह वक्तव्य यादव या व्हिडिओत करताना दिसत आहेत. यादव यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे. मात्र, आपण तेव्हा नशेत होतो आणि आता आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडिओचा वापर केला जात असे असे यादव यांचे म्हणणे आहे.
तुम्ही मोदी यांना मारू शकता का?, असा प्रश्न एका व्यक्तीने यादव यांना विचारला. त्याला उत्तर देताना यादव यांनी वरील आक्षेपार्ह विधान केले. या उत्तरावर व्हिडिओत यादव यांना उद्देशून एक व्यक्ती म्हणते, ‘ भारतात तर कुणी देणार नाही, ( ५० कोटी) पाकिस्तानात देणार.’ या उत्तर देताना पुन्हा तेजबहादूर म्हणतात, ‘ मी देशाशी द्रोह करू शकत नाही.’ हा व्हिडिओ आपलाच असून तो मे-जून २०१७ मधील असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.
त्या वेळी निवडणूक लढवण्याचा माझा इरादा नव्हता. मात्र, मला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक लोकांनी माझी भेट घेतली, असे यादव यांनी सांगितले. हा व्हिडिओ तयार करणाऱ्यांचा नेमका उद्देश काय होता हे मला माहीत नव्हते. लष्करात तर दारू पिण्यास मुभा आहे, असेही अनेक लोक त्यावेळी म्हणत होते, असेही ते म्हणाले. माझा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोक काय काय बाहेर काढतील याचा नेम नाही, असे म्हणत तेजबहादूर यांनी भाजपवर टीका केली.