EVMबाबतची पुनर्विचार याचिका SCनं फेटाळली, विरोधकांना मोठा धक्का

EVM संदर्भात विरोधीपक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी २१ विरोधीपक्षांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. EVMमध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भाजपला होत असून ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे.
विरोधकांकडून यापूर्वी देखील ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ईव्हीएमचा फायदा हा भाजपला होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून याविरोधात सातत्यानं आरोप होत आहेत. ईव्हीएम हॅक करून भाजप निवडणुका जिंकत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.
दरम्यान सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली होती. यावेळी ‘ईव्हीएमबाबत खबरदारी घेतली पाहिजे. सर्व ईव्हीएम या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन्सला कुणी मोबाईल टॉवर, वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून टॅम्पर करू नये, म्हणून जॅमर बसवण्यात यावेत. तसंच प्रत्येक राउंड निकाल जाहीर केला पाहिजे,’ अशा मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या होत्या.