Model Code of conduct : मोदी -शहा यांना निर्दोष ठरविण्यावरून निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिता भंगाच्या पाच तक्रारींमध्ये त्यांना निर्दोष ठरवण्यास निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी विरोध केला होता, अशी माहिती ‘एक्स्प्रेस’ला मिळाली असल्याचे वृत्त “लोकसत्ताने”दिले आहे.
या वृत्तानुसार निवडणूक आयोगाने शनिवारी मोदी यांना आचारसंहिताभंगाच्या सहाव्या तक्रारीबाबत निर्दोष ठरवले होते. पाटण (गुजरात) येथील २१ एप्रिलच्या प्रचारसभेत मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसने केली होती. आपण पाकिस्तानला तंबी दिल्यामुळेच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली होती, असे प्रतिपादन मोदी यांनी या प्रचारसभेत केले होते.
मोदी यांनी वर्धा येथे १ एप्रिलला आणि नांदेड येथे ६ एप्रिलला अल्पसंख्यांक-बहुसंख्यांक उल्लेखाचे भाषण केले होते. तर ९ एप्रिलला लातूर आणि चित्रदुर्ग येथील भाषणात मोदी यांनी नवमतदारांना बालाकोट हवाई कारवाईच्या नावाने मतदान करण्याचे आवाहन केले होते. याबाबतच्या त्यांच्या विरोधातील आचारसंहिताभंगाच्या तक्रारीतून त्यांना निर्दोष ठरवण्यास अशोक लवासा यांनी विरोध केला होता, असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर शहा यांनी ९ एप्रिलच्या नागपूर येथील सभेत वायनाडचा संबंध पाकिस्तानशी जोडणारे भाष्य केले होते. त्यात आचारसंहिता भंग होत नसल्याच्या आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मताशी निवडणूक आयुक्त लवासा यांनी असहमती दर्शवली होती. वायनाडमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढत आहेत. चित्रदुर्ग येथील भाषणाबाबतच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. आयोगावर मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सुशील चंद्रा यांच्यासह अशोक लवासा यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिताभंगाच्या तक्रारींबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रारी करूनही त्यावर कारवाई करण्यात येत नसल्याचे स्पष्ट करत कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे . त्यावर मोदी आणि शहा यांच्याविरोधातील आचारसंहिताभंगाच्या सर्व तक्रारींवर सोमवार, ६ मेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. निवडणूक आयोगाने आतापर्यंत मोदी यांना आचारसंहिताभंगाच्या सहा प्रकरणांत निर्दोष ठरवले आहे.