दुष्काळ: केंद्राकडून राज्याला आणखी २१६० कोटी, मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून आणखी २१६० कोटी रुपये मदतीपोटी प्राप्त झाले असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्याला आतापर्यंत ४२४८.५९ कोटी रुपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले असून राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला सातत्याने भरीव मदत केली जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारकडूनही दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता ४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. दुष्काळ निवारणाची कामे करता यावीत म्हणून आचारसंहिता शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्यानंतर दुष्काळी स्थितीचा नव्याने आढावा घेऊन कामांना वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे.