मोदींचे कुठलेच वक्तव्य निवडणूक आयोगाला वादग्रस्त वाटत नाही , सहाव्यांदा क्लीन चिट …

मोदींचे कुठलेच वक्तव्य निवडणूक आयोगाला वादग्रस्त वाटत नसल्यामुळे निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहाव्यांदा क्लीन चिट दिली आहे. मोदींनी गुजरातच्या पाटणमध्ये केलेल्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग न झाल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला. पाकिस्ताननं हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन यांची सुटका केली नसती, तर ती हत्येची रात्र ठरली असती, असं विधान मोदींनी 21 एप्रिलला केलं होतं.
मोदींच्या या विधानाबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी मोदींनी गुजरातच्या पाटणमध्ये जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हवाई दलाच्या बालाकोटवरील कारवाईचा संदर्भ दिला. ‘पाकिस्ताननं भारताच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानची विमानं त्याच मनसुब्यानं आली होती. मात्र भारतीय हवाई दलानं त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानचं एक विमानदेखील भारतानं उद्ध्वस्त केलं,’ असं मोदी पाटणमधल्या सभेत म्हणाले होते. पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन यांची सुटका केली नसती, तर ती कतल की रात ठरली असती, असंदेखील मोदींनी पुढे म्हटलं होतं.
‘मोदी 12 क्षेपणास्त्र घेऊन तयार होते. पाकिस्ताननं अभिनंदन यांची सुखरुप सुटका केली नसती, तर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती,’ या मोदींच्या विधानाबद्दल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आक्षेप नोंदवला होता. मोदींकडून लष्कराचा आणि बालाकोट एअर स्ट्राइकचा राजकीय वापर सुरू असल्याची तक्रार दोन्ही पक्षांनी केली होती. त्याआधी राजस्थानच्या बारमेरमध्ये मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला होता. आमच्याकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानालाही निवडणूक आयोगानं क्लीन चिट दिली होती.