काँग्रेसच्या नेत्यांनी लष्करप्रमुखांना गुंड आणि वायू दल प्रमुखांना खोटारडे म्हटले : नरेंद्र मोदी यांची टीका

काँग्रेसच्या नेत्यांनी लष्करप्रमुखांना गुंड आणि वायू दल प्रमुखांना खोटारडे म्हटले. त्यांनी जवानांच्या शौर्यावर अविश्वास दाखवला आणि हवाई कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा केल्याविषयी संशय व्यक्त केला. दहशतवाद्यांना दफन करण्यासाठी ‘चादर’ पाठवण्याची या पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे का, काँग्रेसवर अशी अशी टीका करीत आम्ही लक्ष्यभेदी हल्ले केल्याचा दावा करणाऱ्या आणि हल्ल्यांची संख्या वाढवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी व्हिडिओ गेम्स खेळून आपली लक्ष्यभेदी हल्ल्यांची हौस भागवावी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या दाव्याची खिल्ली उडवली.
आमच्या सरकारने लक्ष्यभेदी कारवाई केली हे सत्य काँग्रेसने प्रथम अमान्य केले, त्यानंतर त्याला विरोधही केला आणि आता काँग्रेस मी टू, मी टू असे म्हणत आहे, अशी टीका मोदी यांनी जाहीर प्रचारसभेत केली. काँग्रेसच्या काळात तीन लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आल्याचे त्यांच्या एका नेत्याने चार महिन्यांपूर्वी सांगितले होते, परंतु आता दुसरा नेता मात्र सहा लक्ष्यभेदी हल्ले केल्याचे सांगतो, असा टोला मोदी यांनी लगावला. लक्ष्यभेदी हल्ल्यांची संख्या चार महिन्यांत तीन वरून सहावर गेली. निवडणूक होताच ती ६०० वर जाईल. लक्ष्यभेदी हल्ल्यांची संख्या कागदावर वाढवून काय उपयोग ? काँग्रेस खोटारडा आहे, असा आरोप मोदी यांनी केला. यूपीए सरकारच्या राजवटीत सहा लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आले, त्याची यादी काँग्रेसने सादर केल्यानंतर मोदी यांनी काँग्रेसची खिल्ली उडविली.
पूॅंछ (१९ जून २००८), नीलम नदीचे खोरे शारदा सेक्टर (३० ऑगस्ट-१ सप्टेंबर २०११), सावन पात्रा तपासणी नाका (६ जानेवारी २०१३), नाझपीर सेक्टर (२७-२८ जुलै २०१३), नीलम खोरे (६ ऑगस्ट २०१३) आणि २३ डिसेंबर २०१३ रोजी करण्यात आलेली कारवाई आदी ठिकाणी ‘यूपीए’च्या कारकिर्दीत लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आले, असे काँग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसने प्रथम लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आल्याचे नाकारले, मात्र जनतेचा आपल्यावर विश्वास असल्याने जनता आपल्या पाठीशी ठाम राहिली, असे मोदी म्हणाले. काँग्रेस पक्ष खोटे बोलत असल्याचा आरोप मोदी यांनी केला आणि काँग्रेसने केवळ कागदावरच लक्ष्यभेदी हल्ले केल्याची टीका केली.
हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन यांच्या नावाचा प्रचारात वापर केल्याचा आरोप काँग्रेसने माझ्यावर केला आहे. त्यांच्या एखाद्या नेत्याने किंवा चेल्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. मग न्यायालय निवडणूक आयोगाला एक आठवडय़ात निर्णय द्यायचे आदेश देईल. त्यानंतर निवडणूक आयोग उत्तर देईल की मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केला नाही तर त्यांनी केवळ लोकांचे अभिनंदन केले. मग काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घ्यावी.. काँग्रेसचे नेते अशा प्रकारे एक खेळ खेळत आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.