सर्जिकल स्ट्राईकच्या आधारावर मतांचा जोगवा मागणारे मोदी आणि भाजपा यावेळी सत्तेत येणार नाही , सरकार युपीएचेच बनेल : राहुल गांधी

सर्जिकल स्ट्राईकच्या आधारावर मतांचा जोगवा मागणारे मोदी आणि भाजपा यावेळेसची लोकसभा जिंकू शकणार नाहीत तर काँग्रेसच्या पुढाकाराने यूपीए पुन्हा एकदा सत्तेत येईल याची मला खात्री वाटते असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीं यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. २३ मे रोजी जनतेचा कौल आमच्या बाजूनेच असेल असे ठाम प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले आहे. ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
‘इंडिया टुडे’ शी बोलताना राहुल म्हणाले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात मोठे सामर्थ्य ही त्यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेचेच तुकडे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी वास्तव देशासमोर आणेन आणि मी त्याची सुरूवातही केली आहे असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले. राफेल करारावरही त्यांनी भाष्य केलं. राफेल कराराची सखोल चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळे नियम धाब्यावर बसवून अनिल अंबानी यांना ३० कोटींचा फायदा करून दिला असा आरोप त्यांनी केला. तसेच सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली. यूपीएच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले मात्र आम्ही त्याचा देशभरात डांगोरा पिटला नाही. तसेच त्याच्या आधारावर मतांचा जोगवाही मागितला नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. चौथा टप्पा पार पडल्यानंतर आता भाजपाचा विजय निश्चित झाला आहे आता उर्वरित तीन टप्प्यात आणि एनडीएचा विजय किती मोठा होतो आणि विरोधकांचा पराजय किती मोठा होतो हेच चित्र समोर यायचे बाकी आहे असा विश्वास मोदींनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. राहुल गांधी यांनी मात्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत असे म्हटले आहे. काँग्रेसप्रणित यूपीएचीच सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले आहेत. आता इतर टप्प्यांमध्ये जे मतदान होईल त्यात मतदारांचा कौल कुणाला मिळतो? काँग्रेसला किती जागा मिळणार? भाजपाचे सरकार येणार का? मोदी पंतप्रधान होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं २३ मे रोजी मिळणार आहेत. दरम्यान मोदींची प्रतिमा हेच त्यांचे सामर्थ्य आहे आणि मी ते उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे राहुल गांधींनी म्हटले आहे.