९० दिवसांच्या आत सभांच्या खर्चाचा तपशील द्या , निवडणूक आयोगाची राज ठाकरे यांना नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार करत सभांना गर्दी खेचणारे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना आता त्यांच्या प्रचारांच्या सभांचा खर्च निवडणुक आयोगाला सादर करावा लागणार आहे. राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली. राज ठाकरे यांच्या राज्यभरात मोदीविरोधातील सभा झाल्या. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती आश्वासने दिली आणि त्यातील कोणती आश्वासने पूर्ण झाली याचा लेखाजोखा मांडताना राज ठाकरे यांनी विविध चॅनल्समधील व्हिडिओ क्लिप आणि वर्तमानपत्रांची कात्रणे सभांमध्ये दाखवली होती.
यावरून भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. किंबहुना भाजपने या सभांचा चांगलाच धसका घेतला होता . भाजपच्या वतीने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता , त्यांच्याविरुद्ध काय कायदेशीर कारवाई करता येईल यावरही भाजप अंतर्गत मोठा खल करण्यात आला परंतु त्यांना अद्याप काहीही करता आले नाही . दरम्यान एका पत्रकाराने मात्र त्यांच्याविरुद्ध नायायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे तर आता भाजपच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांना प्रचार सभांच्या खर्चाचा तपशील द्या अशी नोटीस पाठवली आहे .
राज ठाकरे यांचा पक्ष नोंदणीकृत असल्याने साहजिकच त्यांना या सभांच्या खर्चाचा तपशील द्यावा लागणार असून त्याबाबतची नोटीस निवडणूक आयोगाने त्यांना दिली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ९० दिवसांच्या आत खर्च दाखवणे बंधनकारक असल्याने मनसेला त्यांच्या या सभांचा तपशील ९० दिवसांच्या आत द्यावा लागणार आहे. आता निवडणूक न लढवणाऱ्या पक्षाचा खर्च अयोग्य कुठे टाकणार हा हि एक प्रश्नच आहे . कारण मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने त्यांच्या सभांचा खर्च नेमक्या कुणाच्या नावावर दाखवायचा, याबाबत निवडणूक आयोगच संभ्रमात असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. तर, भाजपने हा खर्च मनसेच्या खात्यात दाखवण्यात यावा, अशी मागणी केली होती.