मोदी, शाह यांच्याविरोधातील तक्रारींबाबत सोमवारपर्यंत निर्णय घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिता भंगाबाबतच्या काँग्रेसच्या ९ तक्रारींबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाकडे पुरेसा कालावधी आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे.
प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे एकूण ११ तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून दिरंगाई होत असल्याचा दावा करत काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली.
निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, आम्ही ११ पैकी २ तक्रारींबाबत निर्णय दिला आहे. सोमवारी मतदान असल्याने तक्रारींबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारपर्यंतचा कालावधी द्यावा, अशी विनंती निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली. निवडणूक आयोगाची ही विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाकडे पुरेसा कालावधी आहे, त्यामुळे सोमवारपर्यंत उर्वरित नऊ तक्रारींबाबतही निर्णय घ्यावा, असे आदेश कोर्टाने दिले.