वादग्रस्त विधान प्रकरणी निवडणूक आयोगाकडून साध्वी प्रज्ञावर ७२ तासांची प्रचार बंदी

निवडणूक आयोगाने साध्वींवर ७२ तासांसाठी (३ दिवस) प्रचारावर बंदी घातली आहे. मालेगाव स्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रचारादरम्यान बाबरी विध्वंसाबाबत वादग्रस्त विधान केल्याने आचारसंहितेचा भंग झाला होता. बाबरी मशीद विध्वंसाबाबत बोलताना साध्वींनी आनंद व्यक्त केला होता. तसेच या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त विधानामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे याबाबत कारवाई म्हणून त्यांच्यावर ७२ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गुरुवार सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहे.
या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नाही. भोपाळमधील एका प्रचारादरम्यान, एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना साध्वी म्हणाल्या होत्या की, मी केवळ बाबरी मशीदीवर चढलेच नव्हते तर ती पाडण्यासाठीही प्रयत्न केले होते. या विधानानंतर निवडणूक आयोगाने तत्काळ साध्वीला नोटीस पाठवली होती.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. बाबरीच्या विधानापूर्वी त्यांनी २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. करकरेंचा सर्वनाश होईल असा मी शाप दिला होता, असे त्या म्हणाल्या होत्या.