मुले म्हणाली चौकीदार चोर है , आणि प्रियंकाने रोखले …

अमेठी मतदारसंघातील एका गावात प्रचारासाठी आलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मंगळवारी एका वेगळ्याच अनुभवास सामोरे जावे लागले. प्रियांकांना पाहात काही बालकांनी ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने आश्चर्यचकित झालेल्या प्रियांका यांनी मात्र या बालकांना पंतप्रधानांविरोधात अशा घोषणा देण्यापासून रोखले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात मंगळवारी प्रियांका प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी काही शाळकरी मुलांनी त्यांच्यासमोर गलका केला व काँग्रेस समर्थनाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच त्यांनी राहुल गांधी यांनी देशभर पोहोचवलेली ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा देण्यास सुरुवात केली.
अचानक घडलेल्या या घटनेने धक्का बसलेल्या व आश्चर्यचकित झालेल्या प्रियांका यांचे डोळे विस्फारले. पण क्षणार्धातच त्यांनी या मुलांना रोखले. ‘ये वाला नही. अच्छा नही लगेगा. अच्छे बच्चे बनो’, असे मुलांना समजावत त्यांनी या घोषणा देण्यापासून मुलांना रोखले. त्यावर या मुलांनी ‘राहुल गांधी जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी ट्विटरवर प्रियांका यांच्या भूमिकेचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी प्रत्येक प्रचारसभेत काँग्रेस व गांधी कुटुंबाला लक्ष्य करीत असताना, प्रियांका यांनी लहान मुलांना राजकीय घोषणाबाजीपासून लांब ठेवल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले.