अयोध्येत मोदींकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा पण राम मंदिराच्या मुद्द्याला दिली बगल

पंतप्रधानपदावर असताना मोदी यांचा आजचा पहिलाच अयोध्या दौरा आहे. मात्र येथील सभेला संबोधित करताना मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्याला बगल दिली. ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांची भूमी आहे. ही देशाच्या स्वाभीमानाची भूमी आहे. देशात हाच स्वाभीमान गेल्या ५ वर्षांच्या काळात वाढला असल्याचे मोदी म्हणाले. आम्ही देशातील १३० कोटी लोकांचे हात सोबत घेऊन चाललो आहोत. आता याच हातांच्या सामर्थ्यावर आम्ही नव्या भारत निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत असेही मोदी पुढे म्हणाले. या वेळी मोदींनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.
या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना आपल्या टीकेचे लक्ष केले. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने नेहमीच दहशतवादाविरोधात नरमाईची भूमिका घेतली. आमची सरकारी यंत्रणा दहशतवाद्यांना पकडत असे, मात्र मतांसाठी हे त्यांना सोडून देत असत. आज पुन्हा हे ‘महामिलावटी’ एक असहाय सरकार बनवण्याच्या प्रयत्नांत आहेत. तुम्हाला मात्र सावध राहायला हवे अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले.
‘श्रीलंकेत जी स्थिती आज आहे, ती भारतात सन २०१४ पूर्वी होती. अयोध्या आणि फैजाबादमध्ये झालेले स्फोट कुणीही विसरू शकणार नाही. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून स्फोटांच्या बातम्या येणे बंद झाले आहे. आमच्या शेजारीच दहशतवादाचे कारखाने सुरू आहेत. या दहशतवादी देशांना एक कमकुवत सरकार हवे आहे आणि ते त्याच संधीच्या शोधात आहेत’, अशा शब्दात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी अयोध्येतील सभेत बोलताना केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच्या रुपात मजबूत सरकार येण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच अयोध्येचा दौरा केला. या सभेत बोलताना मोदी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या, मात्र त्यांनी राम मंदिराचा मुद्दा टाळला.