पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी-यावर जीवघेणा हल्ला करुन हल्लेखोर पसार…
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर आणि तानाजी हळवणर या दोघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गावातील एका
खासगी सावकाराने गावातीलच एका महिलेची जमीन
हडप केल्याची तक्रार सोमवारी पोलिसात दाखल झाली
होती. सुरेखा तानाजी हळणवर यांची जमीन खासगी
सावकाराने हडप केल्याची ही तक्रार आहे. या हल्ल्यात
सुरेखा यांचे पती तानाजी देखिल गंभीर जखमी आहेत.
सदरच्या प्रकरणात माऊली हळणवर यांनी गुन्हा दाखल
करण्यात पुढाकार घेतल्याचा राग मनात धरुन या खासगी
सावकाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा हल्ला
केल्याची माहिती मिळत आहे. माऊलीच्या डोक्यात वार
झाल्याने प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पंढरपूरच्या ईश्वर वठार परिसरात हळवणर यांचं घर आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने घरात घुसून हळवणर यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्यामुळे माऊली आणि तानाजी हळवणर यांना गंभीर दुखापत झाली आहे.
अवैध सावकारकीच्या व्यवहारातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटना घडताच माऊली आणि तानाजी यांना तात्काळ पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत
दरम्यान, या प्रकाराची माहिती पंढरपूर पोलिसांना देण्यात आली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. घरात घुसून वार केलेली टोळी नेमकी कोणती होती याचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत.
या प्रकरणी पोलीस हळवणर यांच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत.