भाजपचा प्रचार करणाऱ्या कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला घेतले ताब्यात ….

आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कोण काय बुद्धी वापरेल सांगता येत नाही . नंदुरबार शहरातील असाच एक प्रकार उघडकीस आला . या घटनेत एका कुत्र्याच्या शरीरावर भाजपाच्या प्रचाराचे स्टीकर्स आढळल्याने या कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार लोकसभा मतदारसंघात एका कुत्र्याच्या शरीरावर भाजपाच्या प्रचाराचे स्टीकर्स चिकटवण्यात आले होते. नंदूरबारमध्ये सोमवारी मतदान पार पडले.
नवनाथ नगरमधील रहिवाशी एकनाथ मोतीराम चौधरी (६५) सोमवारी दुपारी अंधारे रुग्णालयाजवळ या कुत्र्यासोबत फिरत होते. भाजपाचे निवडणूक चिन्ह आणि ‘मोदी लाओ, देश बचाओ’ अशा संदेशाचे स्टीकर्स त्या कुत्र्याच्या शरीरावर चिकटवलेले होते.
मतदान सुरु असताना कुत्र्याच्या संपूर्ण शरीरावर भाजपाच्या प्रचाराचे स्टीकर्स चिकटवण्यात आले होते. हा कुत्रा त्याच्या मालकासोबत प्रचाराचे स्टीकर्स लावू फिरत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयपीसीच्या कलम १७१ (अ) अंतर्गत चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी महापालिकेला कुत्र्याचा ताब्यात घेण्यास सांगितले.