साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन : महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांची प्रतिज्ञा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर अयोध्येत आत्महत्या करिन असा निर्धार शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रझवी यांनी जाहीर केल्यानंतर आता पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला असून साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देत भाजपाने भोपाळ मतदारसंघातील निवडणुकीत कथित हिंदू दहशतवादाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दरम्यान, एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामागे भाजप आणि हिंदुत्ववाद्यांती ताकद आहे. तर दिग्विजय सिंह यांनाही अनेक संत महंतांकडून समर्थन मिळत आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज म्हणाले की, ”आज अनेकजण धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. येथे सनातन धर्मामध्ये फूट पाडली जात आहे. मात्र हिंदुत्वावरून राजकारण होता कामा नये. सनातन धर्मावरून राजकारण होता कामा नये. त्यामुळे देशातील संत दिग्विजय सिंह यांच्यासोबत आहेत.”
दिग्विजय सिंह यांना पाठिंबा देताना महाराजांनी मोठी प्रतिज्ञाही केली. ”येत्या ५ मे रोजी कामाख्या मातेचा महायज्ञ करण्यात येणार आहे. या यज्ञात पाच क्विंटल मिरचीची आहुती देण्यात येईल. मात्र या यज्ञा दरम्यान कुणालाही ठसका लागणार नाही. या यज्ञामुळे दिग्विजय सिंह यांचा विजय होईल. तसेच दुर्दैवाने असे झाले नाही तर मी महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज त्याच ठिकाणी जिवंत समाधी घेईन, ही माझी प्रतिज्ञा आहे,”असेही महाराजांनी म्हटले आहे.