‘अब कोर्टने भी माना कि चौकिदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधी यांचा पुन्हा माफीनामा

राफेल प्रकरणी कोर्टानेही ‘चौकीदार चोर’ असल्याचं मान्य केल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, भाजपही राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्लिन चीट दिल्याचं वक्तव्य करत असल्याचं त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे दोन्हीही पक्षांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला आहे.
कोर्टात राफेलप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने दाखल करून घेतल्यानंतर कोर्टानेही ‘चौकीदार चोर’ असल्याचं मान्य केलंय, असं वक्तव्य राहुल यांनी केलं होतं. त्याविरोधात लेखी यांनी कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली होती, आजही त्यांनी कोर्टात त्यांचं म्हणणं मांडून पुन्हा दिलगिरी व्यक्त केली आहे.
भाजच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर आज पुन्हा सुनावणी होती. कोर्टाच्या निर्देशानुसार राहुल यांनी आज कोर्टासमोर आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात त्यांनी जुन्याच मुद्द्यांचा आधार घेत कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलं. मात्र भाजप राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्लिन चीट दिल्याचं सांगून बाहेर त्याचा फायदा उठवत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. दरम्यान, लेखी आणि राहुल यांनी याप्रकरणावर अधिक उत्तर देण्यासाठी मंगळवारपर्यंत वेळ वाढवून देण्याची कोर्टाला विनंती केली आहे.